Happy Anniversary

“Thank you… Thank you very much… तुम्ही सगळे आज इथे वेळात वेळ काढून आलात. तुमचे शाळा, कॉलेज, ऑफिसेस मॅनेज करुन आलात आणि मलामाझ्या नवऱ्याला शुभेच्छा दिल्यात त्यासाठी Thank you. माझ्या मुलांनी माझ्या लग्नाचा ४० वा वाढदिवस एवढ्या थाटामाटात केला यासाठी त्यांनाही Thank you. पण आज मला बोलायचंयखूप बोलायचंय त्यामुळे तुमचा मी वेळ घेणार आहे. हे माझे शब्द नाहीत. २००, ४००, २००० किंवा लाख शब्द असतील. तुम्हाला घरी जायला उशीर होतोय का वगैरे याची मी काळजी घेणार नाही. ती तुमची तुम्ही करा. गेले ४० वर्ष मी फक्त काळजीच करतीये. माझ्या नवऱ्याची, सासू सासऱ्यांची, मग मुलांची, कोण काय म्हणेल त्याची, सगळ्यांच्या खाण्यापिण्यांची, झोपण्याची, वेळांची, पैशाची अशी अनंत काळजी मी गेले अनंत वर्ष करतीये असं मला वाटतंय. मागे एकदा माझ्या मुलीनी मला प्रश्न केला होता की आई बायकांना करायला काहीच नसतं म्हणून बायका लग्न करतात का गं? तिचं बरोबर होतं. मी तेव्हा तिला दुजोरा दिला नाही. पण लग्न झाल्यावर बिझी व्हायला होतं आणि मग रिकामपण मेलं तरी येत नाही. आपली ही अशी अवस्था व्हावी, आपल्याला रिकामपणाचा त्रास होऊ नये या हेतूनंच बायका लग्न करत असाव्यात. आई वडील शिकवतात. मोठं करतात. डिग्री देतात. मग नोकरी लागते. मग पैसे कमवायला सुरुवात होते होते की लग्नाचं सुरु होतं. वय झालं, योग्य वेळी व्हायला हवं असं सगळे आजूबाजूचे म्हणतात. म्हणजे आधी सगळा वेळ काहीतरी मिळवण्यात जातो आणि ते मिळवून enjoy करायला लागायचं सोडून परत enjoy करायला एक पुरुष शोधावा लागतो. शरीराचं वगैरे जाऊ दे. पण नुसते सिनेमे बघायला, हॉटेलिंग करायला, मित्रमैत्रिणींना भेटून आता मजा येत नाही का? त्याला कशाला पुरुष लागतोय? पण कोणा मामी काकूला ते तसं वाटतं आणि त्या आईच्या मागे लागतात मग ती आपल्या. ठीके. चला अशीच गेली वर्ष दोन वर्ष की सगळ्या मैत्रिणी तेच करतात. एकीचं लग्न, दुसरीचं बाळंतपणकी मग आपलीही तीच गरज होऊन बसते. मग लग्न होतं आणि आपण एका संपणाऱ्या दमछाक करवणाऱ्या journey ला सुरुवात करतो. गंमत माहितीये? आमच्या काळात तर divorce पण जास्त व्हायचे नाहीत. म्हणजे अगदीच नवरा मारकुटा निघाला, fraud निघाला तर divorce. किमान माझ्या सारखीच्या घरात. बाकी वेळी संसार करत राहायचा. नवरा मला respect करत नाही, considerable नाही किंवा आमचं ते… married life किंवा couple relation म्हणू आपण. ते ok नाही म्हणून आमच्या पिढीत तरी फारसं कोणी आपल्या partner ला सोडलं नाही. मला वारंवार अनेक बायकांच्या तोंडावर दिसलं की आपला नवरा वागतो ते पटत नाहीये. त्या क्षणी पटत नाहीये किंवा काहींना ते कधीच पटत नव्हतं. हेच नवऱ्यांच्याही बाबतीत दिसलं. काही नवरे त्यांच्या बायकोचा पार पिट्ट्या पडला तरी त्यांना मदत करत नव्हते. काही नवरे त्यांच्या बायकोच्या इतकं मागे पुढे करत होते की जणू लॉटरी लागलीये बायकोच्या सुंदरतेची. किंवा तिचं गोड बोलणं, माना वेळावणं त्यांना वेडं करुन सोडत होतं. काही कर्तृत्ववान नवऱ्यांना दोन वेळचा नीट डबा मिळत नव्हता. घरात मुलांची काळजी घेतली जात नव्हती. बायको house wife असली तरी प्रत्येक कामाला बाई होती पण उपयोग शून्य होता. आपलं कर्तव्य असल्याप्रमाणे हे नवरे दरमहा घरात पैसे देत होते आणि देतच राहिले. बेडरुमपर्यत जाऊन खुलासा करण्याइतकं धाडस माझ्यात नाही पण ते तुमचं तुम्हाला समजेलंच. मी सुद्धा यातलीच. Anniversary च्या दिवशी तुला हे इतकं भयंकर सगळं ऐकवतीये म्हणून माझ्यावर चिडू नकोस वैभव. आज चिडलास तर तो राग मी कमी करणार नाहीये.” संपूर्ण कार्यालयात शांतता पसरली होती. सगळे जण आपापल्या खुर्च्यात स्तब्भ बसले होते. एखाद खुर्ची सरकवण्याचा आवाज आला. एक खोकण्याचा आणि एका लहान बाळाच्या रडण्याचाबाळाची आई नेमकं आत्ताच बाळ का रडलं म्हणून अस्वस्थ होते. त्याला झोके देणे, हलवणे, कानात गुणगुणणे असे प्रकार सुरु करते. बाळाचे बाबा बाळाच्या आईकडे चिडून नजर टाकतात. तिला अजूनच कानकोंडं होतं. “असू दे गं.” स्टेजवरुन सुषमाचा आवाज येतो. “लहान मूल म्हटलं की रडणारंच आणि त्यात तुझी काहीही चूक नाही. तू काही त्याला टाचणी लावलेली नाहीस आणि बाबा आलाय ना बाळाचा?” तिच्या नवऱ्यानी दचकून बघितलं. शाळेत असल्यासारखा तो उभाच राहिला. “बघ आलाय की हा. बाळाला शांतं करणं ही तुम्हा दोघांची जबाबदारी ना? मग दे त्याच्याकडे. बाबा पिल्लुला करतील गप. मी काय बोलतीये ते तू ऐकणं जास्त महत्वाचं आहे. दे त्याच्याकडे.” तिला कानकोंडं झालं होतं पण त्यानी हसऱ्या चेहऱ्यानी ते मूल घेतलं आणि तो खोलीबाहेर पडला. “हे असं माझ्याही बाबतीत घडलं. नवरे वाईट आहेत म्हणून नाही पण आपण कशी मदत करावी हे त्यांचा कधी कळलं नाही म्हणून. आजकाल काही बायकांना कळलंय की नवऱ्यांचं काय सहन करायचं आणि काय नाही. काही अजूनही माझ्या सारख्या बाळटंच राहिल्या आहेत. म्हणजे तुझ्यासारख्या.” ती मुकाटपणे खाली बसली. सुषमानी वैभवकडे बघितलं. तो रागात, संतापात तिच्याकडे बघत होता. सुषमानी माईक सोडला. ती चालत खाली आली. त्याच्यासमोर उभी राहिली.”

कसलातरी आवाज होत होता. सुषमाला काही कळत नव्हतं. कशीबशी जागी झाली तर तिचा नातू एक स्टीलचा डबा तिच्या डोक्याशी वाजवत होता. “Happpy bdday Ajju…” “अरे bdday नाही, anniversary!” “Happy aaniver… sary… Ajju…” सगळे दंगा करत होते. मुलगा ही आला होता. सून दारात उभी होती. नक्की किती वाजलेत बघायला सुषमानी मान तिरपी केली तर भिंतीवर नवीन घड्याळ आलेलं तिला दिसलं. Anniversary सुरु होत होती. ते speech स्वप्नात दिलं होतं. “तुमच्या आवडीचा गोडाचा शिरा केलाय मीआणि आईनी घातलेलं कैरीचं लोणचं घेऊन आलीये येताना.” सुनेचा आवाज. “ती एक फार फार चांगली मुलगी आहे. तिला सोडून जाताना फार वाईट वाटेल. तिला वाटेल का?” सुषमाचा विचार चालूच होता. “Ohk!! आधी सांगावं नाही का लागणार?? की बाई मला हे घर सोडून जायचंय…” नाश्त्यासाठी सगळे जमले. संध्याकाळी बाहेर जेवायला कुठे जाऊया चर्चा होती म्हणजे तो संध्याकाळचा imagine केलेला कार्यक्रम पण स्वप्नातलाच. “मला थोडं बोलायचंय. वैभव खास करुन तुझ्याशी…” मुलांनी चिडवायला सुरुवात केली. “गंभीर आहे पण दुःखद नाहीये आणि मुलांसमोरच बोलायचंय. आपण फार वेगळ्या व्यक्ती आहोत. संसार केला आपण पण संसार कमी आणि तडजोड जास्त केली. इतके वेगळे स्वभाव इतक्या वेगळ्या आवडीनिवडी की सतत डोक्यावर बर्फ ठेवून वावरलो. अनेकदा तुझ्या नजरेत मला दिसलं की अशी बायको हवी होती. एखादी ओळखीची बाई भेटली, बोलली की ही परीक्षा तू नेहमी बघतोस. मी ही तेच करते. तुला ठाऊक असेलंच. मुलंही अनेकदा म्हणाली. तुमचा संसार टिकलाच कसा? आई तू बाबांना ४० वर्ष सहने केलंस? बाबांनी ४० वर्ष कशी काढली?? जे काही असले ते पण divorce घेण्याची ना आपल्यात पद्धत होती ना माझ़्यात तेवढी ताकद होती. पण आता ते बळ आलंय. घाबरु नका मी divorce मागत नाहीये. फक्त मुक्त व्हायचंय मला. हा नाश्ता झाला की माझी बॅग घेऊन मी निघून जाईन. मोबाईल इथेच ठेवेन. असं समजा आई हरवली आणि तिची स्मृती गेली. किंवा असं समजा की आईला आपण नकोसे झालो. जे की खरंय. मला हा कलकलाट नकोय.” “आज्जु मी नाई दंगा करणार!” “सुषमाचे डोळे भरुन आले. याया अशा कारणांमुळेच आजवर मला हे घर सोडणं शक्य झालं नव्हतं.” तिनी शांतपणे शिरा खाल्ला. खोणीच खाऊ शकलं नाही. ती उठून आत गेलीटेबलवर सगळे April fool असणार असा समज करुन बसले. “पण अजून तर मार्च संपतोय!” अशी भाबडी वाक्य त्या बाळानी टाकली. सगळे मजा बघायला थांबले होते. तयार झालेली सुषमा बाहेर आली. दोन मोठ्या बॅग्ज ढकलत निघाली. सगळे तसेच थांबले होते. तिची मागे फिरण्याची पंचाईत बघत. पण ती डोळ्यासमोर गेली सुद्धा. मुलानी हसत फोन लावला. तो आतल्या खोलीत वाजलात्याला प्रचंड भीती वाटू लागली. तो खाली पोचला. धावत ती बसली त्या रिक्षामागे धावला. रिक्षा इतपत लांब होती की तिचा नंबर दिसणार नाही! सुषमा घर, दार, नवरा, पोरं, बाळं, नातवंडं, जबाबदाऱ्या, stress सगळं सोडून निघून गेली होती. आकाशात संधी प्रकाश पडला होता. भगवा पिवळा रंग भरुन राहिला होता.shu-Asia-India-NewDelhi-Sunset-behind-the-President-Residence-563982820-Kriangkrai-Thitimakorn-1440x823

रमलेल्या बाबाची कहाणी

light sunset people water
Photo by Negative Space on Pexels.com

तीच मळकी डब्याची पिशवी. मुळातच मळखाऊ रंगात विकत घेतलेली. झिजलेले बूट, विरलेली बॅग आणि दमलेले बाबा. वर्षानुवर्षे ते त्याच कंपनीचे उंबरे झिजवत आहेत. कंपनीचा मालक बदलला. रिनोवेशन नंतर उंबरे बदलेले ते पण ते झिजवणारे माझे बाबा काही बदलले नाहीत. एकाच कंपनीत आयुष्यभर काम करणं म्हणजे प्रामाणिकपणा, चिकाटी, जिद्द, कंपनीचा आपल्यावर असलेला विश्वास, असं सगळं त्यांना वाटायचं. काका सांगायचा की नवीन नवीन काम म्हणजे आपल्याला असणारी आणि वेळोवेळी वाढत जाणारी मागणी, किंमत आणि अाव्हानं. पण बाबांना ते कधी पटलंच नाही. काका आमच्या घरातून नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला. बाबांना त्याची सिमेंटची बिल्डिंग भकास वाटली. ते त्याच दाराच्या खिट्टीशी लढत रोज खुडबुड करुन, दाराशी कुस्ती खेळून एका लाथेत तोडता येणारं दार महाद्वार समजून रात्री लावून घेत राहिले. काकानं मोठी लांब सडक गाडी घेतली, ते तिला ट्रॅफिकचं आमंत्रण म्हणून त्यांच्या बजाज प्रियावर ढांग टाकून निघून गेले. मी आई अाणि ताई त्यांची सतत कीव करत राहिलो. मला वाटायचं बाबांना कशाची हौस नाही. पण आमचा खडखडता रेडिओ एकही दिवस गायला नाही असं झालं नाही. त्या गाण्यावर त्यांनी ताल धरला नाही, असंही झालं नाही. पगार झाला की बाबा चुकता माझ्यासाठी पेन आणायचे. ताईला ड्रेस आणि आईला वर्षातून एकदा हलके पैंजण. आई ते आनंदानी मिरवायची. ती बाबांना चहा देताना त्या पैंजणांचा हलका नाद आला की बाबांच्या चेहऱ्यावर अजाणतेपणी एक हसू खुलायचं. हातातला पेपर खाली करुन ते कधी आईकडे बघायचे मात्र नाहीत.

सकाळचा गजर झाला की झोपेतही बाबा मला आवरताना दिसायचे. त्यांच्या बूट पॉलिशचा आवाज माझ्या कानात घुमायचा. आईचस कढईवर आपटलेला झारा, बाबांचं ड्रॉवर बंद करताना आईला हाक मारणं, तिचं टेबलवर डबा ठेवणं, हे सगळं माझ्या बंद डोळ्यांसमोर येत रहायचं. हाच त्यांचा तोच तो पणा. त्यांचा तोच पगार. त्याच भाज्या आणि रविवारची वाट पहाणं मला खूप त्रास देई. मनःस्ताप. हे कधीच या साच्यातून बाहेर पडणार नाहीत आणि मला पडू देणार नाहीत अशी मला खात्री होती. एक डिग्री घेऊन माझ्या हातात एक डबा आला की त्यांना अानंद होणार, घरात बायको आली की परमानंद आणि मुलं झाली की माझ्या आयुष्याचं सार्थक. हेच घोकत मी इथवर आलो. इतवर म्हणजे घर सोडून जायच्या निर्णयापर्यंत आणि तो सांगून टाकावा या दिवसापर्यंत!

आमच्याच घरातील एक संध्याकाळ. पावसाची. भज्यांची. वाफाळत्या चहाची. रेडिओच्या मैफिलीची आणि रिझल्टची. काका त्याच्या मुलाची अॅडमिशन अमेरिकेत झाल्याचं सांगायला आला. बाबांना फारसं आवडलंच नव्हतं पण काकाला मात्र मुलाचा प्रचंड अभिमान होता. आईनी पटकन सुधारस आणि गरम पोळ्या केल्या. सगळे जेवले. काका परदेशातल्या एेकलेल्या गोष्टी आम्हाला रंगवून सांगत राहिला. बाबा त्यांच्या कंपनीवर कसे इतर देश अवलंबून आहेत हे परत परत सांगू लागले. गाण्याच्या मैफलीत जशी जुगलबंदी होते तशी दोन भावांची आपापल्या रहाणीमानासाठी जुगलबंदी रंगली होती. ताईनी काकाचा गट निवडला. आईनी बाबांचा. मी चोरुन दिलेल्या परदेशात जायच्या परिक्षेचा निकाल पोटात दाबून तटस्थ होतो. इथून जाणं हा पर्याय मी घरच्यांपासून सुटका या कारणासाठी निवडला होता. माझ्या दमलेल्या बाबांपासून सुटका आणि बाबांची त्यांच्या दमवणाऱ्या कामापासून सुटका. शेवटी बाबाच जिंकले. पैसे हा एकच मोठा फायदा सोडला तर त्याच्याकडे काहीच नव्हतं.

काकाने आणलेलं पान खाल्लं अाणि सेलिब्रेशन संपवून तो गेला. आजची पिढी पैशाच्या मागे कशी धावते आहे यावर बाबा नेहमीप्रमाणे लेक्चर देत होते. मी अर्धनिम्मंच एेकत होतो. ताईचं तर सगळं लक्ष फोनमध्येच होतं. चालता चालता घराचा चौक आला. नेहमीच्या पानवाल्यानं हसून हात केला. बाबा म्हणाले अजून एक खाऊया. पानवाल्यानं कमी गुलकंद आणि टुटीफृटी टाकता माझं पान केलं. मगाचच्या मॉलमधल्या पानाची गोडमिट्ट होऊन बसलेलं तोंड आता नवीन पानाची चव अनुभवू लागलं. बरं वाटलं. बाबा म्हणाले, “बघ बेटा, अशी भरकटतात माणसं. जागा, पैसा, लत्ता यानं काही कमी जास्त होतं नाही. होत असतील तर ती माणसंच. निर्जीव वस्तूत रमण्याइतके का आपण उथळ झालोय? रमावं तर ते माणसात. समोरुन साद मिळते आणि मग सार्थक होतं. माझ्या कंपनीचा भोंगा माझी साद आहे. तू तुझ़्या गिटारवरची धूळ झटक. चष्मा पुसल्यासारखं लख्ख वाटेल.”

आमची पावलं घराकडे वळली. माझे मागासलेले, बुरसटलेल्या विचारांचे बाबा अगदीच टाकाऊ नाहीत अशी खात्री पटली. बाबांना या थराला जाऊन मनात नावं ठेवणारा मी विसरलो होतो. बाप बाप असतो. माझ्या वयाच्या जोशात त्याला थकलेला म्हणणारा मी लिफ्ट वापरणारा आहे. बाबांना चांगलं माहित होतं, वरच्या मजल्यावर पोहोचायला किती पायऱ्या चढायला लागतात. एकच बिल्डिंग धरुन बसणारे ते दुसरीला घाबरलेले नाहीत. फक्त रममाण झाले आहेत. प्रत्येक मजल्यावरच्या प्रत्येक पाटीत आणि नावामागच्या सजीव माणसांत! खोलवर! पुढं जाणं म्हणजे चांगलं आणि एका जागेवर थांबणं म्हणजे वाईट यावर बाबा आणि काकांनी मला खूप विचार करायला लावला. त्यात जिंकणं, हरणं नाहीये. आपल्याला जे हवंय ते ठामपणे जगणं आहे फक्त!

पिंकी

पिंकीच्या चेहऱ्यावर कोवळं ऊन पसरलं. तिला कसलीशी खुडबूड एेकू आली आणि ती बेडवरुन अलगद उतरली. तिच्या पिंक मऊमऊ चपलांमध्ये पाय सरकवत, सिल्की केस मागे टाकत, एक गोड स्वरातली जांभई देत ती किचनच्या दिशेनी निघाली. वाटेत तिच्या पिंक कलरच्या ब्रशनी ब्रश केलं. आरशात पाहिलं तर गुलाबी गुलाबी गाल तजेलदार दिसत होते.

पाणी पिताना तिच्या लक्षात आलं की खुडबूड हॉलमधून येते आहे. मुलगा तिथल्या ड्रॉवरमध्ये काहीतरी शोधत होता. आज रिझल्ट आणि त्याला हॉलतिकीट सापडेना. दहावीचा रिझल्ट होता. “बबू, विसरलेच की मी!” ती सहज म्हणाली. एका नेमक्या जागी बघून त्याला हॉलतिकीट काढून दिलं. मग तो आंघोळीला गेला आणि ती फोनवर बिझी झाली. कसलीतरी पार्टी होती आज म्हणे.

मग तिच्या बाथरुममधून जेव्हा ती आंघोळ करुन बाहेर आली तेव्हा कसले कसले छान छान वास येत होते. इंपोर्टेड कॉसमेटिक्सचे. त्यानंतर एक बेबी पावडर लावून तिनी एक पिंक लांब फ्रॉक घातला. मुलगा बाहेर हॉलमध्ये वाट बघत बसला होता. ती बाहेर आली. मग त्याचे कपडे बघून त्याला जास्त चांगले कपडे घालायला लावले. दोघं घरातून निघाले.

रिझल्ट लागला. मुलगा तिसरा आला होता शाळेत. सगळ्यांसमोर त्याला एक घट्ट मिठी मारली. त्याला ही सवयच होती. पण इतर आया आणि त्यांच्या मुलांना अशी कडकडून मिठी मारायची अाणि ती बघायची सवय नव्हती. पिंकी हळूच एक पापी सुद्धा दिली. त्यानी ती ही घेतली. “जी मुलं पाप्या नाकारतात ती लहान असतात. जी स्वीकारतात ती grown ups असतात.” तिचीच शिकवण होती. तिनी पहिल्या आणि दुसऱ्या आलेल्या मुलाला मोठ्ठी चॉकलेट्स दिली. बाकीच्या सगळ्यांनाही चॉकलेट वाटली. मुलगा खूश होता. ती खूश होती. बाकी सगळे गोंधळलेले.

मग ते एका पार्टीला गेले. लंच पार्टी. पिंकी तिच्या इतर रंगाच्या मैत्रिणी, आदिती, रमा, रेवती, प्रेशिता, अाद्या, मेहेर, उत्तरा. सगळ्याच होत्या. पिंकीच्या मुलानी एकदोघींना चेयर पुल करुन दिली. त्यानंतर हशा, कलकलाट, दंगा असं सगळं चालू होतं. मुलगा सुद्धा ते enjoy करत होता. “Real men appreciate company of women. They don’t get bored, They participate!” पिंकी हे ही नेहमी सांगायची त्याला. तो बोलत होता आणि बोलता बोलता वेटरला अॉर्डर देणं, कोणाचं काय संपलंय ते बघून परत मागवणं, अगदी बटर रोटी पासून पाण्याच्या ग्लासेस पर्यंत. कधीही ग्लासपाशी हात गेला आणि त्यात पाणी नाही असं होता कामा नये, गप्पांमध्ये कोणत्या पदार्थाचा वेट करायला लागतोय हे बरोबर नव्हे अाणि बायका बोलताना, हसताना त्यांची लिंक तुटणे, हे ही बरोबर नव्हे. त्यानी सगळ्यांचे कॅंडीड फोटो ही काढले. प्रत्येकीकडे सांगण्यासारखं खूप होतं. पिंकीला ते सगळं एेकायचं होतं. एेकलं की ते सगळ्ळं इतकं छान वाटत होतं की तिला कसं व्यक्त करु कसं नको असं झालं होतं. “We must contribute to Uttara’s daughter’s hobby. आपण तिचा Easle देऊया!”. काही गप्पा. मग म्हणाली, “मेहेर आपल्यात सगळ्यात लहान आहे, we must throw a party for her brave decision”. मग गप्पा. मग अशा अनेक गिफ्ट्स, पार्टीज, get togethers ची promises! मुलानी ते ही नोट डाऊन केलं. आईचा शब्द राखणं ही आई इतकीच त्याचीही जबाबदारी होती!

मग एक केक आला. पिंकीनीच अॉर्डर केलेला. पण तो टेबलवर आला आणि ती जराशी गोंधळली. तिनी केक अॉर्डर तर केला होता पण तो हा नव्हता. मुलाच्या आवडीचा चॉकलेट केक सांगितला होता तिनी, मग हा तिच्या आवडीचा स्ट्रॉबेरी केक कसा झाला? “Men who can win their girl’s heart!” मुलगा म्हणाला. हे आधी अनेकदा पिंकीच म्हणाली होती. “आईला हवं होतं की तिला मुलगी व्हावी. पण मी झालो. मग तिला हवं होतं की बहीण व्हावी मग बाबा गेले आणि आता नुकतंच माझं ब्रेकअप झालं. माझ्या संपर्कात माझ्या वयाचं माझ्या आवडीचं यावं अाणि मुलींना respect, love, care, appreciation द्यावं, रोज द्यावं देत रहावं असं तिला वाटायचं. She is my mom. After dad, ती माझी बाबा पण आहे. त्यानंतर बहीण झाली. आता girlfriend सुद्धा होईल. तिच्या प्रत्येक जन्मदिवस अाणि वाढदिवसासाठी!” पिंकीचे डोळे भरुन आले. आनंदानी गाल पिंक झाले. तिनी त्याला कवटाळून मिठी मारली. रेवतीनी त्यांचे कॅंडीड्स काढले. “आमच्या ह्यांना सांगायला पाहिजे”, “मुलीला दाखवायला पाहिजे”, “मुलाला शिकवायला पाहिजेअसे अनेक उद्गार निघाले. मस्त केक कापला. सगळे हसत हसत दारातून बाहेर पडले.

मुलानी पिंकीचा हात धरला, “आई, माझ्याबरोबर कॉफी date ला येशील?” पिंकी खळखळून हसली. “As your girlfriend? तुझ़्या emotions ची गडबड handle करायला?”. तो हसला. “नाही. आई म्हणून आईसारखंच बोलायला! So who are you?” “Mom-mom” दोघं खळखळून हसले! आपण एकमेकांच्या आयुष्यात वेगवेगळे रोल करत असतो. मुलगी कधी पूर्णपणे आईची असते, कधी आईची आई होते. बायको जशी बायको, तशी मैत्रीण, कधी आई. नवरा कधी बाबा. बाबा कशी काऊंसिलर. तसाच त्यांचा गेम होता. “Who are you?” – “Friend-friend!!, Enenmy-enemy, slave-slave आणि कधी ‘Everything’” दोघं खूप happy होते. गाडीत बसता बसता त्यांनी संध्याकाळसाठी एक coffee shop निवडलं सुद्धा! “This is our first date, Ashu!”, “Yes Pinki!”. “We must throw a party Prince charming!!”, “Yes momma charming!”. मग गाडीच्या काचा वर झाल्या अाणि त्यांचे पुढचे संवाद फक्त आपल्या मनात राहिले. ते इतर कोणालाच एेकू आले नाहीत.

alcohol alcoholic anniversary beverage
Photo by Pixabay on Pexels.com

प्रेशिता

शाळेच्या रियुनियनला जाणं तिच्या जीवावर आलं होतं. बदकन कॉटवर बसून घट्ट झालेल्या ब्लाऊजची शिवण उसवताना प्रेशिताला वाटलं की काहीतरी कारण सांगावं अाणि यातून सुटका करावी. वॉट्सअॅपचे तसे अनेक तोटे. पण प्रेशिता सगळ्यात जाणवणारा हा! कोणीही उठतं अाणि मेसेज करतं. त्यांच्यापासून लांब पळायचं कसं? शाळेच्या मागे सोडून आलेल्या आठवणी जशाच्या तशा समोर येत होत्या. कोणा एका मुलीनी नंबर शोधून काढला अाणि गृपवर अॅड केलं. मग सगळ्यांना एक compulsory फोटो पाठवायला लावला. मग एक फॅमिली फोटो. मग त्यांची माहिती. शाळेत मॉनिटर असल्यानी प्रेशिताच्या सगळेच मागे लागायचे. अजून नाही आला फोटो अाणि अजून नाही आली माहिती. आता ३० वर्षांपूर्वीच्या मॉनिटरगिरीचा आता काय संबंध? पण नाही. सगळ्यांना एकमेकांच्या आयुष्यात भारी इंटरेस्ट. प्रेशिताला जाणं भाग होतं. सोडायला नवरा येणार होता. तिथे पोहोचलं की एका मैत्रिणीला मिस्ड कॉल द्यायचा होता. मग ती एकटीच बाहेर येणार होती. मग त्याची आणि नवऱ्याची ओळख करुन द्यायची होती. घरी बसणं शक्य नव्हतं कारण घरातल्यांचा आरोप होता की तू सोशलाईज होत नाहीस. घराबाहेर पडून एकटीनं एक सिनेमा बघून यावं तर नवरा सोडणार. दारातून पळून जावं तर ती अतिउत्साही मैत्रीण. म्हणजे काही विचारायलाच नको.

साडीचा सैल केलेला ब्लाऊज, कमीत कमी आवरलेलं अशा अवस्थेतील प्रेशिता गाडीतून उतरली. मुळात गाडी BMW. त्यामुळे तिची अर्धी ओळख तर आधीच झालेली. मैत्रीण आणि नवऱ्याची मैत्रिणीच्या म्हणण्याप्रमाणे झटक्यात मैत्री झाली अाणि प्रेशिता आत गेली. मैत्रीण मुग्धाही तिच्याबरोबर आत आली. साधारण ५०० बायकांचा घोळका होता. सगळया एकदम बोलत होत्या. कोणीच कोणाचं काही एेकत नाहीये असं तिला वाटलं. एक तास संपला आणि बाई बाहेर गेल्या की एकाक्षणात वर्गाचंही असंच व्हायचं याची तिला आठवण झाली!

पहिलं लिंबू सरबत चाललं होतं. तिच्याबरोबर आठवीच्या नाटकात काम केलेली मधुरा तिच्यापाशी आली. “बरीच बारीक झालीस गं. मागच्या वर्षी फोटो पाहिलेला फेसबुकवर. दिवाळीचा नाही का? पणती लावताना?” प्रेशितानी हसल्यासारखं केलं. प्रेशिताकडे तिच्याशी बोलण्यासारखं काही नव्हतं. “ब्लाऊज फारच बोअर गं. शाळेत कशी फॅशन करायचीस केसांची नेहमी. वेणीला कधी सागरवेणी, कधी झोपाळा. आता हौस राहिली नाही वाटतं!” प्रेशिताला काय बोलावं ते कळेना. “आवडतं पण हा जरा आहे साधा.” प्रेशितानी तिच्या ब्लाऊजचं निरीक्षण केलं. दोन लांब बाह्या, मागे गोल गळा. फ्रंट ओपन. यात काय फॅशन अाहे ते तिला सापडेना! तिनी दोन घोट सरबत घेतलं. ती सरबत सोडून इतरही काहीबाही घेते अाणि ते नवऱ्याला आवडतं हे ही सांगितलं. मग खऱ्या ब्लाऊजवर ती परत आली. “मुलगी मोठी झाली आहे. हल्ली तिला नको ते ही कळतं अाणि मग खरी पंचाईत होते. उगाच फॅशन केली मागच्या आठवड्यात अाणि पटकन बोलून गेली. बाबांना हे आवडतं वाटतं. म्हणे मेल्याहून मेल्यासारखं झालं.” मग मधुराला कोणीतरी हाक मारली आणि ती गेली. प्रेशिता गप्पा मारायला परत एक सावज शोधू लागली.

पनीरचे कबाब खाताना एक आपटे नावाची म्हणजे आडनावाची बाई समोर आली. तिची मुलं कशी आजारी पडतात अाणि चारलोकांत कोणी त्यांना पिचकट म्हटलं की कसं कानकोंडं होतं ते सांगून गेली. एकीचा डिवोर्स होणार होता. कोणालातरी अजून मूल होत नव्हतं. कोणाला तरी कॅन्सर डिटेक्ट झालेला. कोणीतरी लॉटरीमध्ये गाडी जिंकलं. प्रेशिताला आता या कार्यक्रमात आल्याचं फार वाईट वाटत नव्हतं. कोणाशी बोलू हा एक मोठ्ठा प्रश्न सुटला होता! सगळी लोकं आपापलीच येत होती. त्यातून बोलायची गरजच नव्हती. तिथे सगळे वक्तेच होते. त्यामुळे प्रेशिता सारख्या अशा एखाद्या श्रोत्याला फारच महत्व होते.

पहिला राऊंड आपल्या बद्दलचा झाल्यावर दुसऱ्या राऊंडला सगळे वेगळी माहिती घेऊन आले. “तुला माहितीये का? तिच्या म्हणे सासूचा तिला फार त्रास आहे.” “सारखे भांडतात. डिवोर्स नाहीतर काय होणार?!” “BMW घेतली. साध्या पोस्टवर आहे नवरा. एवढाल्ले पैसे कुठून आले कोणास ठाऊक?” “मी तर बाई सर्रळ खोटं सांगते कंबर धरली म्हणून! तू?” प्रेशितानी एक झोळी पसरुन अनंत अशा गप्पा, कागाळ्या, चुगल्या, गुपितं गिळली. कानातून, डोक्यात अाणि डोक्यातून थेट पोटात टाकलं. मध्ये मनाचा रस्ता धरलाच नाही. डोक्यातून एक वाक्य मात्र काढता आला नाही. “कोणाला सांगू नकोस बरंका!”

जेवण झाल्यावर कस्टर्ड खात खात प्रेशिता जरा त्या हॉलमध्ये फिरत होती. तिला व्हायचं होतं की माहित नाही पण आता ती त्यांच्यातलीच एक झाली होती. सगळ्यांचं तिच्याशी एक आपलेपणाचं नातं जोडलं गेलं होतं. मुग्धाला, प्रेशिताच्या त्या मैत्रिणीला आल्यापासून उसंत नव्हती. काही ना काही काम होतंच. तिचा या कार्यक्रमात मोठा वाटा होता. आता कार्यक्रम चांगला झालाय आणि संपत आलाय अशी खात्री पटल्यावर मुग्धा आली. प्रेशिताच्या शेजारी हुश्श करुन बसली. “आपल्याला बोलायला वेळच नाही मिळाला बघ!” प्रेशिताच्या चेहऱ्यावर तेच हलकं हसू आलं. प्रेशिताचा फोन वाजला. घ्यायला नवरा आला होता. दोघी दारापर्यंत आल्या. “कोणाला सांगू नकोस, पण मी कायमची ओमान शिफ्ट होईन कदाचित. तसं अजून कशात काही नाही पण हा कार्यक्रम करुन घेतला. नंतर मनात राहायला नको. सांगू नकोस हं.” तिनी परत एकदा आठवण केली. “इतक्या लवकर कशाला आलात. गप्पा संपायच्या होत्याअसं म्हणत नवीनच झालेल्या मित्राला मुग्धानी टाळी दिली. तो दचकला पण दिली टाळी त्यानी निमूटपणानी घेतली.

प्रेशिता, तिला सोशलाईज करु पाहणारा तिचा नवरा आणि रेडिओ! “मग? काय झालं कार्यक्रमात?” प्रेशिताचं तेच हलकं हसू. “भेटीगाठी, काही खास नाही.” तिनं AC बंद करुन खिडकी उघडत रेडिओचा आवाज वाढवला. गाणं कुठलं लागलं होतं कोणास ठाऊक! तिच्या डोक्यात घुमत होतं, “कोणाला सांगू नकोस हं!”

assorted hanging paper lamps
Photo by Melissa on Pexels.com

आद्या

बेल वाजली. ती लॅपटॉप ठेवून उठली. दार उघडून बघितलं तर सिलेंडरवाला आला होता. तिनी सेफटी डोअर उघडलं नाही. आत जाऊन गॅसचं पुस्तक आणि रिकामा सिलेंडर आणला. त्याला ठरलेले पैसे दिले. त्यानी हमालीचे २० रुपये मागितले. तिनी साफ नकार दिला. त्यानी सिलेंडर आत आणून द्यायला नाराजी दर्शवली. तिनी त्यावर काहीच बोलता सिलेंडर उचलला. त्याच्या चेहरा बघण्यासारखा झाला होता पण तिला तो बघण्यात रस नव्हता. तिनी आतून दार लावून घेतलं. सिंलेडर आत आणला. त्याला ट्रॉली नव्हती. तो बेसिन खालच्या स्टोरेज स्पेसमध्ये ठेवला. ती परत कामाला बसली.

ती आता गर्दीच्या रस्त्यावरच्या पार्किंगमध्ये होती. तिची गाडी एका खड्ड्यात अडकली होती. ती जोर लावून गाडी बाहेर काढायचा प्रयत्न करत होती. एक माणूस आला. तिची गाडी बाहेर ओढायला मदत करायला लागला. ती थांबली. “मी मदत नाही मागितली.” तो जरासा हसला. तरीही मदत करु लागला. पलीकडे एक काका त्यांची गाडी मागे ओढायचा प्रयत्न करत होते. “त्यांना मदत करा. त्यांना मदत लागेल.” तो तुच्छतेनी बघून म्हणाला, “त्यांना कशाला?” आणि निघून गेला.

बेडच्या खाली तिचं सोन्याचं कानातलं पडलं. ती आणि नवरा दोघं मिळून शोधत होते. बराच वेळ सापडत नव्हतं. शेवटी बेड हलवावा लागेल असं ठरलं. तो तिला म्हणाला, “जा. झाडू घेऊन ये. मी बेड सरकवतो.” ती हसली आणि म्हणाली. “मी सरकवते बेड, तू झाडू आण.” “का?” तिचं उत्तर सोप्पं आणि सरळ होतं. “ज्या बाजूनी बेड ढकलायचा आहे, त्या बाजूला मी उभी आहे. बाजूला सरक.” तो मिश्कील हसून बाजूला झाला. तिनी बेड ढकलला. लीलया. त्याला तिचा अभिमान वाटला. त्यानी कौतुक केलं. “वाह रे मेरे शेर! माय सुपरमॅन!”. ती जाऊन झाडू घेऊन आली. “शेरनी! आणि हो. सुपरवुमन.”

जिममध्ये एकानी बारला खूप वजनं लावली होती. त्याच्या काडी हातांवर तो फुगे आणायचा प्रयत्न करत होता. ती तिथे आली. त्यानी बाही वर करुन त्याच्या दंड ती आपल्याला न्याहाळत आहे का? या शोधात न्याहाळला. तिने ते केलं नाही. बारपाशी गेली. तो उपकारानी म्हणाला, “मी देतो वजन काढून.” ती म्हणाली, “नाही नको. मी घेईन adjust करुन.” तो तिच्यापेक्षा वयानी किंचित मोठा वाटत होता. तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. “नको. माझ्यामुळे कशाला उगाच त्रास.” त्यानी बोलता बोलता बाहेरचे पाच किलो काढले. “मदत करायचीच असेल तर काढून नको. वाढवून द्या.” ती बोलता बोलता आणखी पाच किलो घेऊन आली. आरशात बघत तिची पोझिशन घेत होती पण सबंध आरशात कुठे हातावरच्या पोट फुगवलेल्या बेडकी तिला दिसल्याच नाहीत.

ती दवाखान्यात गेली. डॉक्टरांनी विचारलं काय होतंय? “मला सर्टिफिकेट हवंय!” “कसलं इलनेसचं?” ती चिंतेत म्हणाली, “फिटनेसचं”. “मग ब्लडटेस्ट करुया.” तिला त्यांना कसं समजवावं कळेना. “अहो तंदुरुस्त, तगडी, दणकट अाणि खणकर असल्याचं.” पुढे डॉक्टर एेकतंच होते. “जात्यावर दळणारी, विहीरीतून पाणी उपसणारी, घागरी वाहून नेणारी, चुलीसमोर तासन्तास बसणारी, तव्यावरपूर्वी लोखंडी, आता नॉनस्टिकचटके खाणारी, दरमहा मेन्स्ट्रुएशनला अपार वेदनांना सोसणारी, बाळाला नऊ महिने पोटात वाढवणारी, त्याचं वजन आपल्या मांड्यांनी पेलणारी, घर आणि आॅफिस दोन्ही सांभाळणारी, सगळ्यांचं जेवण झालं की मागून बसेपर्यंत भूक आवरुन जेवणावळी वाढणारी, आपटून आपटून धुणं धुणारी ही पूर्वीच्या काळापासून शारीरिक कष्टांनी घेरलेली स्त्री जमात नाजूक, पिचकट, अबला आहे यावर कोण आणि का विश्वास ठेवतं? चकल्या घालायला पंजात जोर लागतो. पुरण शिजवताना दंड भरुन येतात. कपडे धुताना ओंडवं बसून पायांची परीक्षा पाहिली जाते. एकही अवयव नाही जो शारीरिक परीक्षा देत नाही. हे झालं घरकाम करणाऱ्या स्त्रीयांचं. ज्यांना खास करुन मखरात बसवल्याचा आभास निर्माण केला जातो. बाहेर पडणाऱ्या स्त्रिया तर बाहेर पडणाऱ्या पुरुषांपेक्षा खास वेगळं किंवा कमी दर्जाचं असं काय करतात?  मग आम्ही पिचकट कश्या? मी पिचकट कशी? माझी स्पर्धा नाही कोणाशी. पण मला विजेतेपद हवंय. असं की माझ्या ताकदीवर कोणी शंका घेणार नाही.”

सर्टिफिकेट मिळालं नाही. ती स्वतःला सांगत राहिली जे मनात असतं, ते डोक्यात जाऊन येतं. जे डोक्यात जाऊन टिकतं ते आपलं शरीर करतं. मुलींचं डोकं आणि मन फार धारदार असतं. सुरीनी कित्येकदा कापलं तरी दुखऱ्या बोटाला बाजूला करुन गरम उलथनं धरण्याएवढं किंवा पोटातल्या कळांना विसरुन कामावर जाऊन इतरांबरोबर उभं राहणारं!

underwater photography of woman
Photo by Engin Akyurt on Pexels.com

वेदिका

एका सुंदर सकाळी वेदिका चालायला म्हणून बाहेर पडली. पारिजातकाचा सडा बघून मन अजूनच प्रसन्न झालं. नुकतीच एक अवेळी पडून गेलेली सर होतीच प्रसन्नता वाढवायला. बघू तिथे झाडं बहरलेली होती आणि फांद्यांवर पक्षी किलबिलाट करत होते. थांबून तिनं परिसरावर एक नजर टाकली आणि पारिजातकाच्या सड्याच्या मधनं, एकाही फुलावर पाय पडू देता ती त्याला ओलांडून गेली. वाटेत एक कुत्र लागलं. तिला त्यांची भयंकर भीती. पण तिनी मान खाली घालून तिचं चालणं चालू ठेवलं आणि तो निघून गेला, त्याच्या मार्गानी. तिला पक्क माहित होता. मुक्या प्राण्यांवर प्रेम करायचं असतं. प्रेम करणं म्हणजे हात लावणं, कुरवाळणं असंच नाही. तर प्रेमाची व्याख्या कधी कधी त्यांच्यापासून लांब रहाणं अशीही असू शकते. कोणालाच आपला त्रास होणं याची काळजी घेणं हे ही एक प्रकारचं कुरवाळणंच की. तिला पक्कं माहित होतं.

एक रस्ता क्रॉस करुन गल्ली बदलली. तिला रस्त्यात दोन मुलं ओंडवी बसलेली दिसली. काहीतरी होतं, जे ती मुलं मन लावून बघत होती. तिला रहावलं नाही. ती ही खाली बसली. त्यांच्या सारखीच ओंडवी. “काय बघताय. मला पण सांगा ना!”. ती दोघं खुदकन्हसली. “या फुलपाखराला अर्धाच पंख आहे.” तिला फार वाईट वाटलं. पण त्या फुलपाखराला हात लावायची हिंमत मात्र तिच्यात नव्हती. तिनी त्या मुलांनाच सांगितलं कीत्याला उचलून कुठे सावलीत, कोणत्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये ठेवता का? म्हणजे ते जगेल.” “मरु दे की मेलं तर. मस्त लाल लाल रक्त फ्लो होईल.” “त्याला आपण धरुन आपटुया का?” वेदिकाला काय बोलावं कळेना. पण त्याला उचलून बाजूलाही करता येईना. मुलं त्यांची बॅट घेऊन पळून गेली.

वेदिकानी रस्त्यातून जाणाऱ्या एका माणसाची मदत मागितली. “अहो एका फुलपाखराला वाचवायचंय. जरा येता का?” वेदिकाला कोणी वेडी म्हणून त्यानी तुच्छ नजरेनी बाद करुन तो निघून गेला. त्यानंतर तिनी एका मागून एक दोन तीन लोकांना हाका मारल्या. कोणीच आलं नाही. ती क्रिकेट खेळणारी मुलं साधारण पाचवी सहावीत असतील. ते मध्ये मध्ये वेदिकाकडे नजर टाकून तिला वेड्यात काढत होतेच. वेदिकानं जवळून जाणाऱ्या फेरीवाल्याला थांबवलं. तो म्हणाला की तुमचा वेळ जात नाहीये. वेदिकाला मात्र फार फार वेळ जातोय यात असं वाटत होतं. तिला घरी जाऊन काय काय करायचंय हे तिनं रात्रीच लिहून ठेवलं होतं. त्या फुलपाखरा भोवती तिनी चार दगडं लावली. कोणी गाडी वरुन जाताना पडू नये म्हणून आजूबाजूला पडलेल्या काही फांद्या भोवतालनी खोचल्या आणि निघाली.

थेट घरी आली. डायनिंग टेबलवर सगळे बसले होते. तिनं भास्करला सांगितलं. “माझ्या बरोबर लगेच ये.” तो पोहे टाकून उठला. वेदिका कधीच अशी विनाकारण बोलवत नाही. रोहन पण लगेच उठला, “मी पण येतो.” बाकी सुप्रिया आणि विनीत आज काय नवीन? सनडे स्पेशल असेल या आविर्भावात पोहे खातच राहिले.

तिघं घाईनी त्या जागेपाशी पोहचले. कोणीच ते दगड हलवले नव्हते. जसा फुलपाखला जीवन द्यायला कोणाला वेळ नव्हता तसाच यासाठी ही वेळ नव्हता. त्यात नक्की खड्डा आहे की काय हे तरी कोणी कशाला बघितलं असेल? रोहननी पटकन एका पानावर ते फुलपाखरु घेतलं. भास्करनी ते कोपऱ्यात सरकवून ठेवलं आणि रविवार सकाळच्यासनडे, फनडेअशा मूड मध्ये तिघं एकमेकांचा हात धरुन घरी चालत गेले. लिफ्टचं बटण दाबायला रोहनला दोन उड्या मारायला लागल्या. दार उगडल्यावर वेदिकानी भास्करला हात दिला. घाईत त्यानी त्याची काठी घरीच ठेवली होती. वेदिकानी तिचा स्पॉन्डिलायटिसचा बेल्ट काढून जरा वारं घेतलं. तीन रिकामटेकड्या अाणि वेड्या लोकांची सकाळ त्यांच्यामते सार्थकी लागली होती. वय नाही तरी निरागसपणानी त्यांना बांधलं होतं.

 

shallow focus photography of brown black and yellow butterfly on yellow flower
Photo by Swapnil Sharma on Pexels.com

रमा

तोंडातून मोठ्यमोठ्या आरोळ्या देण्याचा ती प्रयत्न करत होती. हातपाय झाडत होती. स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती. पण यातलं काहीच शक्य नव्हतं. दोन मोठ्या दोऱ्यांनी, म्हणजे दोरखंडच जवळजवळ बरंका! तर दोन मोठ्या दोऱ्यांनी एका पुरातन लाकडी खुर्चीला रमाला बांधून ठेवलं होतं. तिला मरणप्राय यातना होत होत्या. घाम फुटला होता. मनानी ती खचली होती. पण आता तिसरा तास होता की ती भूकपाणी याशिवाय एका खुर्चीत अडकून पडली होती. त्या तोंडाला लावलेल्या मोठ्या चिकटपट्टीच्या आत बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून घसा पार सुकला, सुजला आणि लालेलाल झाला होता. स्वतःच्या सख्ख्या मुलांनी तिच्यावर ही वेळ आणली होती. मुलानी बांधलं होतं अाणि मुलीनी ती पट्टी लावली होती. नवरा कोपऱ्यात शांतपणे उभा होता पण एकही चकार त्यानी काढला नाही. तशीच ओरडून ओरडून रमा झोपी गेली. खरंतर निपचित पडली आणि डोळ्यासमोर काहीबाही तरळू लागलं.

भिंतीवरचं घड्याळ बंद पडलं होतं. सकाळची घाई होती. रमाची आता चिडचिड होते की काय असा रंग घरातल्या सगळ्यांना दिसत होता. पण प्रत्येक जण आपापल्या परीनी कामात होते. रमाचा मोबाईल किचनच्या ओट्यावर होताच. त्यावर दर पाच मिनिटांचे अलार्म लावलेले होते. तिला सगळ्यांचा चहा करायचा होता. सगळ्यांचा म्हणजे तिचा आणि नवऱ्याचा. मुलासाठी कॉफी. मुलीसाठी हळद दूध. सध्या मुलगी पी हळदच्या मूडमध्ये होती. मुलाला पाच हाका मारुन उठवायचं होतं. मग त्याची कॉफी परत एकदा गरम करायची होती. तो आला तर ठीक नाहीतर मुलीला आंघोळीला धाडायचं होतं आणि नवऱ्याला दाढी करायला. मग परत एकदा मुलाला ब्रश करायला. मग कॉफी गरम राहिली तर ठीक नाहीतर परत गरम करायची. त्यात जर साय, सायटं यांच्या कुटुंबातलं कोणीही असेल तरी त्यांची पाठवणी करुन ती कॉफी दुसऱ्या कपात ओतायची होती. मग मुलगा येणार आणि कॉफीचं इनस्पेक्शन करणार. मग त्याला समजवायचं की यात काही काहीही सायटं बियटं नाहीये. तो पर्यंत इकडे कणीक भिजलेली असते अाणि भाजी शिजलेली असते. मग तिला त्या नाश्त्याच्याच ताटल्यांमध्ये नाश्ता काढून त्या पोह्यांवर खोबरंकोथिंबीर घालून म्हणजे ह्यांना थोडं खोबरंथोडी कोथिंबीर, तिला थोडं खोबरंभरपूर कोथिंबीर, त्याला खूप खोबरंथोडी कोथिंबीर आणि स्वतःला उरलेलं सगळं ताटलीत ढकलून तिला विसळून कशावर तरी ते झाकण टाकायचं होतं. मग डब्याच्या अनेक तऱ्हा, त्यात भाजी, कोशिंबीर, पोळ्या, ताक. मुलासाठी अंडीबलक काढलेली, मुलीला काकड्या जास्त, नवऱ्याला फरसाण. हे सगळं नाही केलं तर म्हणे वरुन कोणीतरी बघतो अाणि तिला पाप लागतं. त्यामुळे हे सगळं करायचं अाणि अजून अजून करायचं अाणि ओढवून घ्यायचं. कारण तिला या सगळ्यांपेक्षा अॉफिसला वीस मिनिटं उशीरा निघायचं असतं, मग तो वेळ उरला तर? बापरे केवढं पाप होईल? नको नको. आपण एक काम करुया. ढोकळ्यासाठी पटकन डाळ घालुया का भिजत? ओके. घातली.

तसं रमाला फार काम नसतं. अॉफिस झालं की ती आईकडे चक्कर टाकते. तिथे त्यांचा टीव्हीचा रिमोट चालत नसतो, नाहीतर पत्र आलेलं असतं अाणि वाचायला जमत नाही. किंवा नळ बंद पडतो, पाणी येत नाही, ते साबणावरुन घसरुन पडतात अाणि काहीच झालं नाही तर आयुष्याला कंटाळतात. मग त्यांना समजवायचं. ते झालं की पटकन गाडीवर बसून चटकन घरी जाऊन, मिनिटात इंस्टंट नसलेला ढोकळा करायचा, मग भाकरी, भाजी, आमटी, भात मग जास्त काही नाही. उद्याची भाजी चिरायची आणि झोपायला जायचं. पण लगेच झोपायचं नाही. कारण आल्या आल्या लावलेल्या टीव्हीवरची शेवटची सिरियल सुरु असते अाणि लायब्ररी नाही का? होच की. ती आहेच की. तिचं पुस्तक पूर्ण करायचं असतं. मग ते वाचता वाचता १२ वाजतात अाणि झोप उडते. पण मग काय करायचं असा प्रश्न नाही पडत. तिचे कुर्ते असतात ना अल्टर करायला. शर्टाची बटणं असतात लावायला. काहीच नाही तर मग एक कप्पा आवरुन होतो. मग झोपायचं. वॉचमनच्या आधी आपण झोपलो तर मग पाप लागतं म्हणे!

सकाळी अलार्म वाजतो पण आपण अलार्मनी नाही उठायचं. रमा काय करते ठाऊक आहे? अलार्म कधी वाजेल याची वाट बघत बसते. “आई तुला जाग कशी गं येते?” असा एक आळोख्यापिळोख्यातला प्रश्न आला कीदोन मुलांची आई झालं की उडते झोप.” असं म्हणून त्या गरीब बिचाऱ्या निरागसाची झोप उडवायची. मग दिवस आदल्या दिवशी सारखाच असतो पण जास्त नाही. दोन तीन गोष्टी त्यात वाढलेल्या असतात. कालच्या इतकंच आज काम केलं तर कसं चालेल? प्रगती नावाची काही गोष्ट आहे की नाही जगात?

रमाला हलकी जाग आली. तिला आठवलं मटकी फडक्यात बांधून ठेवली आहे. जास्त मोड आलेले चालत नाही. फोन चार्जिंगला लावायचा राहिला. आईनी फोन केला तर? आणि आॅफिसचं काम घरी आणलेलं. ते पूर्ण नाही झालं तर मग खरंच काही खरं नाही. केवढं मोठं पाप!!! पापांची बेरीजच व्हायची! तिच्या तोंडावरची पट्टी काढली गेली. हात मोकळे केले. मुलगी थर्ड डिग्री द्यायला यावी तशी जवळ आली. म्हणाली, लोकं दारुची नशा करतात. कोणी खिशात पुड्या ठेवतं. तुझ्या पर्समध्ये एक संपणारा एनर्जी सोर्स आहे. तो आम्हाला दे! रमा कावरीबावरी झाली. मुलांनी काही मागितलं आणि मी दिलं नाही तर मोठंच पाप. पण हे कसं देऊ??? मुलगा म्हणाला, “आई तू आता रिटायर होते आहेस. तो एनर्जी सोर्स आम्हाला दे.” तिला पळून जायचं होतं. पण बंद खोली, अंधारी. तिला काहीच ओळखीचं वाटेना!!! तिनी परत एकदा डोळे मिटून ते जुनं स्वप्न पहायचा प्रयत्न केला. ते ही जमेना.

रमाला दचकून परत एकदा जाग आली. सारं घर निवांत झोपलं होतं. बघितलं तर अलार्म व्हायला दोन मिनिटं होती. तिला आनंदाची उकळी फुटली. टुणकन्उठून ती बांधलेली मटकी बघायला उठली. बेक्कार स्वप्न होतं असं म्हणायच्या आधी त्याच्या आफ्टर पार्टीसाठी आज घरी गुलाबजाम करायचा तिनी चंग बांधला सुद्धा! आणि हो. मुलीला गुलाबजाम आवडत नाहीत त्यामुळे कुडकुड साखर वाजणारं, केशर घातलेलं, भरपूर चारोळी भुरभुरवलेलं पांढरं श्रीखंड! पुरीबरोबर!!! पुण्यच, पुण्य!!

person flattening dough with rolling pin
Photo by rawpixel.com on Pexels.com

मेहेर

तुम्हारे ममी पापा इतने झगडते है, तुमको कैसा लगता होगा?” जेवणाचं ताट भरुन घेतानाव्यक्तीनी मेहेरला प्रश्न केला. तिनी उत्तर दिलं नाही. ती उद्धट, उर्मठ आहे म्हणून नाही, पण तिला उत्तर माहितच नव्हतं. आईबाबा भांडले तर मग काय? म्हणजे त्यानी मला काय वाटतं? काहीही वाटेल, त्यानी हिला काय फरक पडत असावा? “एेसे, फिल्मो की लोनली चाईल्ड जैसा फील होता होगा!”. “नही एेसा कुछ नही होता.” त्याव्यक्तीला पुरेसं मनोरंजन मिळावं नसावं. त्यामुळे तिनी जेवणाच्या बफे लाईन मधल्या भरभरुन पापड घेणाऱ्याव्यक्तीला यात ओढलं. ‘व्यक्तीला रोज जेवताना टीव्ही बघण्याची सवय असावी. त्यामुळेव्यक्तीनी पुढचा एपिसोड गेस केला. “त्यांचा डोवोर्स होणार आहे का?” मेहेरला कळून चुकलं की आता यांना आवर घालायलाच हवा. जेवणाची ताटं घेऊन तिघी त्यांचा त्यांचा गोल करुन बसल्या. मेहेरनी स्पष्टपणे सांगितलं की डिवोर्सचा तिला चान्स वाटत नाहीये. कारण ती लहान असल्यापासून आईबाबा भांडत आहेत अाणि तिला लग्नासाठी बघतायेत. त्यामुळे एवढे दिवसात घडलेली डिवोर्सची घटना आता कुठून घडावी. ‘व्यक्तीलाही मनोरंजन मिळेनासं झालं. “इतकी वाईट नाहीये माझी फॅमिली. फक्त भांडणं होतात. कारण मतभेद आहेत. पण सगळे सगळ्यांसाठी चांगलंच मागतात देवाकडे!”

आज खूप दिवसांनी मेहेरनी तिची डायरी बाहेर काढली. ती नेहमी ठरवायची की आजपासून डायरी लिहायची. एक दोन दिवस लिहिली मग वाटायचं हेच जे आज घडलं, परत तेच काय सगळं लिहित बसायचं? त्यामुळे मग सोडून द्यायची. त्या डायरीत वर्षातून एखादी नोंद जाते. मेहेरला आज लिहून काढायचं होतं की तिचे आईबाबा का चांगले आहेत? ही बाब रोज घडणारी नव्हती, त्यामुळे या लिखाणात तोच तो पणा नव्हता. तिला कुठेतरी नोंद करायची होती की त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. ते एकमेकांसाठी जगत नसले तरी एकमेकांबरोबर जगतात अाणि त्यात त्यांना आनंद आहे. तिला डायरीत लिहायचं होतं. मनात कोरायचं होतं. तिचे आईबाबा एकमेकांशी भांडले तरी दोघांचं तिच्याशी प्रेमाचं नातं होतं आणि केव्हाही मेहेरचा विषय निघाला की त्यांचं एकमत व्हायचं. आई तिलाच सांगायची की बघ ना बाबा कसं करतो! आणि बाबा नंतर येऊन विचारायचे की आई आली का? बोलली का तुझ्याशी? राग गेलाय का तिचा? ह्या पर्सनल गोष्टी कुठे कळणारआणिला? आणि सांगणार तरी कशा? पण घराच्या खिडकीतून मात्र भांडणाचेच तर आवाज बाहेर जातात.

आधी मेहेरला खूप राग यायचा असं बोलणाऱ्या, विचारणाऱ्या लोकांचा पण मग तिनीच स्वतःला समजावलं की मी आईबाबांना एकमेकांचा हात धरुन समुद्र किनारी फिरताना बघितलंय, बाबाला आईच्या तापात डोक्यावर घड्या ठेवताना बघितलंय. ताप नसताना तिच्या डोक्याला ताप करतानाही बघितलंय अाणि आईला रागात, भांडणात, चिडचिडीत, आदळआपटीतही त्याच्यासाठी स्वयंपाक करताना बघितलंय. हे कुठे आणि कोणाकोणाला जाऊन सांगणार? मोठी भांडणं आवाजामुळे चार भिंतीत राहत नाहीत. छोटी भांडणं छोटी असतात म्हणून ती चार भिंतीत ठेवायची गरज नसते.

एकदा मेहेरनी तिच्या डायरीत लिहिलं की मला माझ्या आईबाबांच्या नात्याची लाज वाटते, कारण ते भांडतात. आईनी ते चुकून वाचलं आणि त्याविषयी मेहेरशी एकही शब्द बोलली नाही. मेहेरला हे कळलं पण आई समोर हा विषय काढायची तिची तरी हिंमत कुठे झाली? त्या दिवसापासून ती आजपर्यंत त्यांच्या नात्यातल्या चांगल्या गोष्टी शोधते आहे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ती स्वतः. भांडण कुठूनही सुरु होऊदे. ते थांबतं मेहेरपाशी आणि मेहेरसाठी. मग एक दिवस तिला वाटलं की हा त्रिकोण आहे. कुटुंबाचा त्रिकोण. यात प्रेम आहे पण तणाव सुद्धा आहे. कमीजास्त प्रमाणात प्रत्येक कुटुंबात असतो. प्रत्येकाच्या हातात दोन टोकं आहेत. समोरच्यानी ओढलं की आपण थोडं सैल सोडायचं आणि त्याच्याकडून सैल सुटलं तर जरा ताण द्यायचा. आईबाबा हा खेळ दोघातंच खेळून कंटाळले असतील म्हणून आपल्या हातात टोकं दिली. मेहेरनी इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं, खचून जाणं म्हणजे हातातली टोकं ढिली सोडण्यासारखं आहे. तिला मनापासून पटला हा रस्सी बॅलेन्सचा खेळ.

तिनी डायरीत लिहिलं. कोणतंही नातं चांगलं, वाईट किंवा यशस्वीअपयशी नसतं. ते फक्त असतं किंवा नसतं. आपले आईबाबा आपल्यासाठी काय सोसतात हे आपण त्यांच्या नात्याला शेरा देऊन ठरवू नाही शकत. आपण कुटुंबाला नावं नाही ठेवू शकत. कोण जाणे आपल्या समोर हसणाऱ्या व्यक्ती बंद खोलीत झिंज्या ओढत असतील आणि चारलोकांत टाकून बोलणारी माणसं त्यांच्या विश्वात कशी मशगूल असतील? आणि कोणीआणिदुसऱ्याच्या आयुष्यात डोकावताना, त्यांचे दोर खेचताना, अापले दोर कोणत्या दारात टाकून येत असतील?

low angle view of woman relaxing on beach against blue sky
Photo by Chevanon Photography on Pexels.com

उत्तरा

नाकाला रुमाल बांधून गाऊनला नसलेला पदर खोचून उत्तरा झाडूचा झेंडा भिंतींवरुन फडकवत होती. दसरा अाणि दिवाळीची जोरदार तयारी करायला तिनी सलग दिवसांची सुट्टी आणि ते तीन दिवस फुलटाईम बाई पकडली होती. बाई झपाझप एका मागून एक कप्पे पुसत सुटली होती अाणि घराचा मोठासा भाग स्वच्छ करायला मदत करत होती. “कुठे जायचंय का घाईनी?” उत्तरानी तिची गती बघून विचारलं. तशी ती हातातलं फडकं टाकून समोर ओंडवी बसली. “पोरीला बदडायचंय!”. उत्तरासाठी हे उत्तर अनपेक्षित होतं. “बदडायचंय?”. तिनी हा प्रश्न विचारताना परत एकदा कानानी एेकला आणि आपण काय बोललो आणि एेकलं याची खातरजमा करुन घेतली. बाईचं म्हणणं होतं की कुटुंबाशी भांडून अाणि सगळ्यांचा विरोध पत्करुन मुलीला शाळेत घातलं तरी तिला त्याची किंमतच नाहीये. मुलगी मजामस्तीत जगते. उत्तरा विसरली होती, ही हिची कितवी मुलगी आणि आता कितवीत आहे. “दुसरीत”. तिनी मोठ्या अभिमानानी सांगितलं. “दुसरी?” जेवढी शक्य होईल तेवढी तुच्छता! “पास झाली का?”… “झाली पन बाकी पोरी लई मार्क आनतात”. उत्तरा मनापासून हसली. बाईच्या चेहऱ्यावर शंकाच होती. बदडायला पाहिजे की नको याचा काही सोक्ष मोक्ष झाला नव्हता. तिनी फडकं घेतलं आणि पुसायला परत सुरुवात झाली.

एक नवीन कप्पा उघडला तर त्यात खूपच धूळ होती. बाईनी त्यातनं एकेक गठ्ठे काढले आणि बाहेर आदळले. “तुला पाहिजे का रुमाल? सर्दी होईल”. उत्तरा तशी इतरांची काळजी करणारी होती. प्रेमळ होती. एक निळ्या रंगाची पिशवी बाहेर आली अाणि तिनी जोरात आपटली. आपटली त्यापेक्षा पाच पटीनी जोरात ती उत्तराला वाटली. “अगं हळू ना! केवढ्यांदा दणकवतेस?” बाईला उत्तराच्या अपसेट मूडचं कारण कळलं नव्हतं. त्या पिशवीवरुन अलगद हात फिरवत उत्तरानी आत डोकावून बघितलं. शाळेची प्रगती पुस्तकं होती. तिच्या मनाचा नकोसा वाटणारा कोपरा. आज उत्तरा किती शिकली आहे, कुठे नोकरी करते आणि किती कमवते याला फारसं महत्त्व नाही. कारण ती तिच्या कुटुंबाला, मुलांना, नवऱ्याला आणि सासूसासऱ्यांना पोसायला समर्थ आहे एवढं पुरेसं आहे. पण आजच्या या उत्तरा मागे शाळेत खूप कमी मार्क्स मिळणाऱ्या, मैत्रिणींमध्ये सतत थट्टेचा विषय होणाऱ्या उत्तराचा एक चेहरा दडला आहे. वाईट जितकं मार्कांचं वाटायचं ना, त्यापेक्षा जास्त आईच्या वागण्याचं वाटायचं. ही मंगल बाई जशी मुलीला झोडपणार अाहे, तसं आईनी आपल्याशी वागावं असं उत्तराला फार वाटायचं. पण कधीच तशी वागली नाही. कोणास ठाऊक का? आपल्यावर इतकं प्रेम असावं तिचं की तिला हातच उगारावासा वाटू नये.

तुमची आई कधी येणार आहे?” मंगल बाईनी लिंक तोडली. “येईल दिवाळीला अाणि मग कायमची इथेच राहणार आहे.” तिच्या चेहऱ्यावरची माशी हलली नाही. मान फक्त वरखाली झाली. उत्तरानी एकेक प्रगती पुस्तक उघडलं. पाचवीचं. पाचवीचा रिझल्ट लागला तेव्हा तिला खूप आलेला. आपण पहिले आलोच नाही म्हणून. आपणच सगळ्यात चांगली विद्यार्थीनी आहोत आणि आपल्याला सगळ्यात जास्त मार्क्स मिळणार याची खात्री होती. पण उत्तराचा २९ वा नंबर आला. आईनी कवटाळून जवळ घेतलं आणि म्हणाली, “अभ्यास केलास तेवढं सगळं लिहिता आलेलं दिसतंय!” आईनी ओरडायला हवं अशी तिची अपेक्षा होती. आपल्याच मुलांना काय रागवायचं? असं आई नेहमी म्हणत असे तिला. पण मग काय इतरांच्या मुलांना रागवायचं का? आणि आई बाबा रागाचलेच नाहीत तर प्रगती कशी होईल? उत्तरा अाणि आईचा एकतर्फी वाद व्हायचा. सहावीला तिनी जास्त अभ्यास केला होता. तेव्हा १४ वा नंबर आलेला. आईनी फक्त खीर केली आणि उत्तराच्या वादातच पडली नाही. मग सातवीला १२ वा, आठवीला वा वगैरे वगैरे. उत्तराला मजा वाटली. कशी काय मी दर वर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त मार्क्स मिळवत गेले? आणि अशा मुलीच्या आईनी खूष व्हायचं की तिला मारायचं? उत्तराला सगळे वादच निरर्थक वाटू लागले. काय म्हणावं कळेना.

आॅक्टोबर हीटसाठी खाली काढलेल्या माठातून ग्लासभर पाणी प्यायलं अाणि मंगललाही दिलं. मग सवयीप्रमाणे तिनी मोबाईल हातात घेतला. आईशी काही फार प्रेमाचे बंध नव्हते. म्हणजे होते पण प्रत्येक वाक्यावर भांडण व्हायचं. दोघी कधीच एकमेकांच्या कलानी घ्यायच्या नाहीत. आईला वाटायचं भांडण झालं तरी चालेल पण मुलीला योग्य तेच सांगायला हवं अाणि उत्तराला वाटायचं की कुठे आयडियल मातेचा पुतळा होऊन फिरायचंय? आता हा वाद आई आल्यावर रोजचा होणार होता. उत्तराला आईला मेसेज करावासा वाटला. नेहमी ती फोनच करायची. शेवटचा मेसेज तीन आठवडे आधीचा होता. उत्तरानी प्रमोशन झाल्याचं कळवलं होतं. आईनी वेळ घेऊन वॉट्सअॅपवर असलेल्या टाळ्या, पिपाण्या, हसरे चेहरे, केक, बीयर ग्लास आणि जे काही उपलब्ध असलेलं सगळं लाईन लावून पाठवलं होतं. तेव्हाही उत्तराला राग आलाच होता. हे प्रमोशन दोन वेळा तिच्या हातून सुटलं होतं. ते मिळालं याचं काय कौतुक, ते माझंच होतं असा तिचा ठाम विचार होता.

मंगल हात पुसत निघाली होती. उत्तरानी ठरल्याप्रमाणे शंभर रुपये काढून दिले. फ्रीजमध्ये काल आणलेला एक पेढ्याचा बॉक्स होता. “किती मिळाले म्हणालीस?” मंगलनं मान पाडूनछपन्नअसं सांगितलं. “आणि मागच्या वर्षी?”. “जाऊ दे ना ताई.” उत्तराला उत्तर हवंच होतं. “का जाऊदे? सांग”. “पहिल्या घडीला फेल झाली. मग ढकललं दुसरीत.” उत्तराचा आनंद गगनात मावेना. “अगं मग हे पेढे दे सगळ्यांना आणि मुलीला एक चॉकलेट घे माझ्याकडून. मागच्या वर्षी पेक्षा खूप बरंय की!” मंगलचया बदडायच्या प्लॅनचं पाणी झालं होतं. मंगलच्या चेहऱ्यावरची माशी हलली नाही. फक्त मान वरखाली झाली!

pen writing notes studying
Photo by Tookapic on Pexels.com

रेवती

खूप गर्दी होती आज ट्रेनला. गुरुवार दुपार आणि दुपारचं बोचरं ऊन. त्यात घाम. इतका की नुसती चिकचिक. ट्रेनमध्ये ज्याला स्पर्श होईल त्याचा घाम लागत होता. अजूनच मरगळ पसरत होती त्या वासाबरोबर. अर्धा ट्रेनचा डबा पिवळ्या रंगात रंगला होता. पिवळ्या साड्या, पिवळे कुर्ते, पिवळे टॉप्स. या सगऴया पिवळ्यांमध्ये एक धमक्क सूर्यफूल उभं होतं. रेवती. ट्रेनच्या दाराजवळ. जाडजूड कॉटनचा घेरदार कुर्ता आणि आता घट्ट जीन्स घालून. कानात मोठ्ठे मोठ्ठे झुमके, हातात एक लाईट ब्ल्यु पर्स आणि एक मोठ्ठी पिशवी. या सगळ्या बरोबर तिनी एक हसू सुद्धा घातलं होतं . आपला कोणीतरी फोटो काढतंय असं हसू. स्टेशनामागून स्टेशन जात होतं. पण स्माईल काही कमी होईना. आतून आनंदाच्या उकळ्या फुटाव्यात असं हसू. आत्ताच कोणीतरी मागणी घातलीये किंवा कोणा खास मुलाला भेटायला चालली आहे असं हसू. गालातल्या गालात वरखाली, कमीजास्त होणारं. ट्रेन थांबली. ती खाली उतरली. एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. एका अननोन नंबरवरुन मेसेज आला. .१५. तिनी घड्याळ बघितलं तर .३७. ती जोरात कुणीतरी पाठीमागे लागल्यासारखी धावू लागली. त्या पिशवीचं, पर्सचं आणि तिच्या कुर्त्याचं वजन काही कमी नव्हतं. पसाराही खूप होता. कोणीही जागा देत नव्हतं. कुर्ता जिने झाडत होता. ती परत परत तो वर धरत होती पण पिशवीचं वळ तिला त्रास देत होतं आणि एखादं टोक लोंबकळतच होतं. चेहऱ्यावरचं हसू मात्र कमी होत नव्हतं. वरच्या ब्रिजवरुन तिला ट्रेन येताना दिसली. कोणालाही धक्का देता किंवा कोणाचाही घाम आपल्याला पुसून घेता ती अंग काढून झपाझप पुढे सरकत होती. पायऱ्यांवरुन हम आपके है कौन प्रमाणे उतरत असताना काय झालं कोण जाणे तिची दिशाच बदलली आणि काही समजायच्या आत तिच्याभोवती माणसांचा घोळका तयार झाला. रेवती जमिनीवर अाडवी होती. “पिशवी? पिशवी कुठाय?” कोणीतरी तिची पिशवी तिला दिली आणि तिने आत वाकून बघितलं. तिचं महत्वाचं सामान आत असल्याचं समाधान आलं चेहऱ्यावर. नीट बघितलं तर एका मोठ्या बुटाचा ठसा तिच्या कुर्त्याच्या टोकावर उठला होता. तो बघून तिला हसूच फुटलं. “अहो बाई जरा सांभाळून. कोण डोक्यावर पाय द्यायला पन कमी करणार नाहीत.” तिथला पोलीस म्हणाला. “पाणी चांगलंय ना?” त्याचं उत्तर येण्याआधीच त्याच्या हातातली पाण्याची बाटली घेऊन पाणी प्यायला सुरुवात झाली होती. “कोनतरी धक्का देऊन पाडलं तुम्हाला”, “नाही नाही, कोणाचा तरी पाय पडला माझ्या कुर्त्यावरतिनी हसतंच सांगितलं. दोघं चालत तिथल्या अॉफिसपाशी गेले. तिनी खुर्चीवर पिशवी ठेवली आणि उभी राहिली. तो पोलीस एका कपटात खुडबुड करत होता. “फक्त बॅंडेड मिळाली तरी चालेल.” त्या खोलीतले इतर जण ही तिच्याकडे बघत होते. ती आलटून पालटून सगळ्यांकडे बघून स्माईल करत होती. ते शंकेत बुडून गेले होते. तिला बॅंडेड मिळाली. “एवढं कुठे चाललाय?” “अहो माहितीये का? अंधेरीला पोहचायचंय मला .१५ ला. कसंही करुन.” “मग आताची फास्ट घ्या ना. आधीच्या स्लो साठी कशाला एवढं धावलात?” तिच्या चेहऱ्यावर एकदम समाधान, आनंद, आशा, उत्साह, प्रसन्नता सगळं काही झळकलं. “बरं झालं मी पडले. वॉव मला फास्ट ट्रेन मिळाली. मला माहितच नव्हतं. मी नाही रोज ट्रॅवल करत ट्रेननी.” तिला घ्यायला एक शोफर ड्रिवर लिमोझीन आल्यासारखी ती उत्साहात बाहेर पडली. पोलीसांना आपल्या समोरुन जाणाऱ्या ट्रेनचं आपल्याला अप्रूप असायला हवं अशी उगाचच एक भावना चाटून गेली. “फार फाटलेलं दिसत नाहीये ना?” निघतानाही तिनी एक निखळ प्रश्न त्या पोलिसावर भिरकावला. त्यानी काहीच उत्तर दिलं नाही. त्याचा कोरा चेहरा बघून ती हसून निघून गेली. “मी पोलीस ना!” तो बाजूच्याला म्हणाला. कोणीतरी मनात म्हणालं. “पण म्हणजे माणूसच ना?” ती पळत पळत ट्रेनपाशी जाताना मागे वळून वळून तिच्या फाटलेल्या टोकाकडे बघत राहिली आणि मग शेवटच्या लेडिज डब्यात पडता चढली. चढताना मात्र मगाशी ओढली गेलेली चप्पल तुटल्याचं तिच्या लक्षात आलं. स्वतःचीच हसू आलं. बघितलं तर डब्यातल्या बऱ्याच बायकांच्या पायात चप्पल नव्हती. तिनी तिची चप्पल डब्यात बसलेल्या भंगारवालीपाशी जाऊन काढली. ह्या डब्यात गर्दी नव्हती. हा डबा कमी पिवळा होता. कमी घाम होता. जे झालं ते बरं झालं वाटायला लावणारा होता. अंधेरी स्टेशन अालं आणि एक मुलगी डब्यात शिरली. रेवती अशी हाक मारत आली आणि मग अनेकssss”, “ओहssss”, “ऊईsss” असे चित्कार निघाले. दोघींनी घट्ट मिठी मारली. आताचे घाम वेगळे होते. पिशवीतून एक डबा बाहेर आला. “मी केलाय.” रेवती अभिमानानी म्हणाली. मैत्रिणीनी बिन तक्रार तो गोळा झालेला केक खाल्ला. “ते माझं ढवळून निघालेलं प्रेम आहे.” रेवती म्हणाली आणि दोघी वेड्यासारख्या हसत सुटल्या. “मी चपलांच्या शॉपिंगच्या तयारीनी आलीये बघ आणि कुर्त्यांच्या पण” लहान मुली फ्रॉक दाखवतात तसं कौतुकानी गोल फिरून दाखवत रेवती म्हणाली. ट्रेन प्लॅटफॉर्म सोडून गेली. काही क्षण त्यांचं हसणं एेकू आलं. मग ते हसू इतरांना एक झलक द्यायला निघून गेलं. रेवतीला, तिच्या मैत्रिणीला भेटायच्या उत्कंठेपेक्षा, मैत्रिणीची उत्कंठा कैक पटीनी जास्त असत असेल, नाही का?
grayscale photography of people walking in train station
Photo by Skitterphoto on Pexels.com